सोलापूर : सालाबादप्रमाणे बाळे येथील श्री खंडोबा यात्रा मार्गशीर्ष शुद्ध चंपाषष्ठी (सट) बुधवार, दि. २६ नोव्हेंबर २०२५ पासून मोठ्या उत्साहात सुरू होत आहे. रविवार दि. ३० नोव्हेंबर, ७ डिसेंबर आणि १४ डिसेंबर २०२५ या तीनही रविवारीसह एकूण चार दिवस ही यात्रा पार पडणार असून महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून लाखो भाविक दर्शनासाठी येणार आहेत.
दररोज रात्री ८ वाजता श्री खंडोबांची घोडा पालखी आणि विद्युत रोशनाईने सजविलेला मानाचा नंदिध्वज यांची भव्य मिरवणूक यात्रेचे विशेष आकर्षण ठरणार आहे. पहाटे ५ वाजता काकड आरती, सकाळी ८ वाजता आणि रात्री ७ वाजता महापूजा-अभिषेक तसेच दिवसभर जागरण-गोंधळ, वाघ्या-मुरळी नृत्य, भंडारा, वारू सोडणे, नवस फेडणे, जावळ इत्यादी पारंपरिक विधी पार पडतील.
भाविकांच्या सोयीसाठी पोलिसांकडून कडक बंदोबस्त, तर महापालिकेकडून सिटी बस व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. देवस्थान ट्रस्टचे चेअरमन विनय ढेपे व सर्व पुजारी मंडळी यात्रेचे नियोजन पाहत आहेत.
पौष शु. षष्टी, बांगरषष्ठी शुक्रवार दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी मानकरी पाटील, तोडकरी, कांबळे, सुरवसे, गावडे आदींच्या उपस्थितीत महाप्रसाद वाटपाने यात्रेचा समारोप होणार आहे.


