सोलापूर ,: उपमुख्यमंत्री व तत्कालीन वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र श्री अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापुरात उभारण्याची घोषणा करून या अभियानासाठी तब्बल २०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र, अजित पवार गट सत्तेत सामील झाला आणि आता या उत्कृष्टता केंद्रांतर्गत असलेले प्रशिक्षण केंद्र सोलापुरातून हलवून ते थेट बारामतीला नेण्याचा निर्णय घेतला आहे. याला सर्वस्वी भाजप व पालकमंत्री चंद्रकांत पाटील हेच जबाबदार असून सदरचे केंद्र सोलापुरातच ठेवावे, अन्यथा पालकमंत्र्यांना घेराव घालण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी दिला आहे.
प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते प्रा. काकासाहेब कुलकर्णी यांनी जिल्हा प्रशासनाकडे खुलासा करण्याबाबत मागणी केली होती. त्याप्रमाणे सोलापूर जिल्हा प्रशासनाने खुलासा केला असून सदरचे प्रशिक्षण केंद्र हे बारामतीला जाणार असल्याचे आता सिध्द झाले आहे.
एक जिल्हा एक उत्पादन या आधारावर सोलापूर, ठाणे व नंदूरबार या जिल्ह्यांकरिता हे केंद्र होते. २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी या प्रकल्पासाठी शासन खर्च करणार होते; परंतु सदर केंद्र हलवल्यामुळे सोलापूर जिल्हा हा विकासापासून वंचित राहणार आहे. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार असून याची सर्वस्वी जबाबदारी भाजपची आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी तत्काळ राजीनामे देऊन घरी बसावे. श्री अन्न उत्कृष्टता केंद्र हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी या ठिकाणीच राहावे. ते स्थलांतर झाल्यास जिल्हा काँग्रेसच्यावतीने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन उभे करण्यात येईल. तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना घेराव घालून जाब विचारण्यात येईल, असा इशारा हत्तुरे यांनी दिला आहे.