येस न्युज नेटवर्क : गुजरातमध्ये पार पडणाऱ्या 36 व्या नॅशनल गेम्स (National Games 2022) अर्थात राष्ट्रीय खेळ स्पर्धा 2022 मध्ये बीडच्या परळी येथील श्रद्धा गायकवाडने सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. स्केट बोर्डिंग क्रिकेट प्रकारात तिने केलेल्या या कामगिरीमुळे फ्रान्समध्ये होणाऱ्या आगामी ऑलिम्पिकसाठी भारतीय संघातही तिची निवड झाली आहे. या निवडीबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून परळीसह अवघ्या महाराष्ट्रसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे.
श्रद्धा गायकवाड ही ऑलम्पिकसाठी निवड होणारी परळीतील पहिलीच खेळाडू ठरली आहे. त्यामुळे परळीसाठी ही अत्यंत गौरवाची बाब ठरली आहे. अहमदाबाद येथे पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत परळीच्या श्रध्दा रविंद्र गायकवाडने स्केट बोर्डिंग या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे. श्रद्धाचे वडिल रविंद्र गायकवाड हे परळी येथील रहिवाशी असून ते सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात, अशामध्ये श्रद्धाने मिळवलेलं हे यश गायकवाड कुटुंबियांसह परळीसाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे.
बिकट परिस्थितीवर मात करत श्रद्धाचं यश
श्रद्धा गायकवाड या परळीच्या सुवर्णकन्येने परळीचे नाव संपूर्ण भारत देशात गाजवले आहे. परळीचे रविंद्र गायकवाड यांची ती कन्या असून रविंद्र गायकवाड हे पुण्यामध्ये एका खाजगी कंपनी मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. त्यामुळे अतिशय बिकट परिस्थितीमधून श्रद्धाने ही सुवर्ण कामगिरी केली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.