सांगली : करोनाबाधितांची संख्या कमी असलेल्या झोनमध्ये रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल, असे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीमधील पत्रकारपरिषदेत बोलताना सांगितले आहे.
तसेच, ज्या जिल्ह्यांमध्ये रूग्ण वाढ कमी होत नाही. त्या जिल्ह्यात मात्र हे निर्बंध असेच राहतील. त्यामुळे काही गोष्टींमध्ये शिथिलता जिथे करणं शक्य आहे, तिथे आम्ही करतो आहोत. जिथे करणे थोडसे अवघड आहे, तिथल्या नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले . सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झाले आहे. हजारो कुटुंबांना फटका बसला असून घरासह व्यवसायाचं नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून पिकेही वाया गेली आहेत. काही ठिकाणी जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीतील भिलवडीला भेट दिली. दरम्यान, या संकटातून मार्ग काढणारचं, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.