मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भ्रष्ट मंत्र्यांविरोधात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज पार्क मध्ये देखील उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरेंनी भ्रष्टाचारावरुन सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. ‘महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात शिवसेना रस्त्यावर उतरली आहे, सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करायला मर्द लागतो, तो मर्द आपल्या शिवसेनेत आहे.’ असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.












भ्रष्टाचारावरुन सरकारला घेरत उद्धव ठाकरे म्हणाले, ‘सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र भ्रष्टाचाराच्या पहिल्या रांगेत बसवला आणि विकासाच्या रांगेत मात्र शेवटी बसवला आहे. यांचा कारभार जनताभिमुख नाही तर पैसे गिळणाऱ्याचं यांचं तोंड आहे.’ उद्धव ठाकरेंनी मंत्र्यांवरही तिखट वार केला आहे. ते म्हणाले, ‘कुणी डान्सबार चालवतंय, कुणी बॅगा घेऊन बसलंय, रमी मंत्री भरसभागृहात रमी खेळतात. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करायला यांच्याकडे पैसे नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला यांना वेळ नाही, देवेंद्र फडणवीस भाजपाची परंपरा पुढे चालवणारे आहेत असं आम्हाला वाटलं होतं. मंत्र्यांची हकालपट्टी केली जाईल, असा विश्वास होता. पण त्यांनी गैरवर्तन करणाऱ्यांना फक्त समज देऊन सोडून दिलेलं आहे. चांगली गोष्ट आहे पण भ्रष्टाचाऱ्यांविरोधात पुरावे आहेत तरी त्यांना सोडून देणार असाल तर मग धनकड यांना तात्काळ राजीनामा घेऊन वनवासात का पाठवलं याचंही उत्तर द्या.’
धनकड यांच्या राजीनाम्याबाबत भाष्य करत ठाकरे म्हणाले, ‘धनकड यांचा राजीनामा का घेतला? याचं कारण काही समजलं नाही. त्यांना तडकाफडकी काढून गायब केलं. धनकड यांना फक्त समज का दिली नाही ?’ चीनमध्ये सरकारविरोधात कळत असो वा नकळत बोलणाऱ्या व्यक्ती गायब होतात, तसंच भाजपचं सुरु असल्याचा दावा त्यांनी केला, असा दावाही ठाकरेंनी केला. मग उपराष्ट्रपती आहेत कुठे ते सर्वांना सांगा, असेही ठाकरे म्हणाले. तर ‘आज मी सगळ्यांना म्हणजेच सगळ्या शिवसैनिकांना सांगतोय मोदींनी जशी चाय पे चर्चा केली होती तशी तुम्ही आता लोकांशी चर्चा करा. आता भ्रष्टाचार पे चर्चा करा. भ्रष्टाचारी मंत्री जोपर्यंत हाकलले जात नाहीत तोपर्यंत आपलं आंदोलन थांबणार नाही,’ अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.