मुंबई : आदित्य ठाकरेंना काही माहित नसते. ते बालिश आहेत. मला त्यांच्याबद्दल काही विचारु नका, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले आहे. यावेळी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. तसेच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा एकनाथ शिंदे यांचाच होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
लघुउद्योग भारती संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन मुंबई (विलेपार्ले) येथे होत आहे. त्यात राज्यभरातून लघुउद्योजक सहभागी झाले आहेत. शहरासह ग्रामीण भागात लघुउद्योगांना चालना देण्यासाठी हे अधिवेशन महत्त्वाचे मानले जातेय. त्यात उद्योजक आपल्या विविध समस्या मांडतात. मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे हे अधिवेशन होऊ शकले नव्हते. या अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात नारायण राणे यांनी मार्गदर्शन केले.
मागील निवडणुकीत शिवसेना भाजपसोबत एकत्र लढली होती. पण उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली. गद्दारी करणे हे त्यांच्या रक्तात आहे, म्हणून ते सारखं गद्दार गद्दार म्हणत आहेत. एकनाथ शिंदे साहेबांचे शिवसैनिक आहेत. त्यांनी साहेबांना साथ दिली म्हणून आज शिवसेना उभी राहिली. ते लोणी आज आदित्य ठाकरे खात आहेत, असा घणाघाती हल्लाबोल नारायण राणे यांनी केलाय.