येस न्युज नेटवर्क : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सुरू असलेला वाद आता वारसदारांवर येऊन पोहचला आहे. त्यामुळे आता ठाकरे-शिंदेंची पुढची पिढी म्हणजेच आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहे. कारण एकाच दिवशी एकाच मतदारसंघात ही दोन्ही युवा नेते शक्तिप्रदर्शन करणार आहे. विशेष म्हणजे बहुचर्चित राहणारे अब्दुल सत्तार यांचं होमपीच समजल्या जाणाऱ्या सिल्लोडमध्ये हा सामना रंगणार आहे.
आता सामना वारसदारांमध्ये!
एकनाथ शिंदे यांनी 40 पेक्षा अधिक आमदार सोबत नेत शिवसेनेत बंडखोरी केली. तेव्हापासून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद पाहायला मिळतोय. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. परंतु या दोन्ही नेत्यातील वाद आता वारसदारांपर्यंत येऊन पोहचला आहे. सिल्लोड येथील सभेत उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे मेळावा घेणार आहेत, तर त्याच दिवशी सिल्लोडमध्येच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची सुद्धा सभा होणार आहे. त्यामुळे या दोन्ही युवराजांपैकी कोण मैदान मारणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.