येस न्युज मराठी नेटवर्क : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची धग आता ग्रामीण भागात पोहचू लागली आहे. आज, मंगळवारी नगर जिल्ह्यातील राहुरी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रस्तावर उतरून केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध केला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. राहुरी तालुक्यातील स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले व केंद्र सरकार विरोधात रोष व्यक्त केला. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची केंद्र सरकारने ताबडतोब दखल घेवून तोडगा काढावा, यासाठी आंदोलन केल्याचे संघटनेने स्पष्ट केले.
याप्रसंगी रविंद्र मोरे म्हणाले, ‘गेल्या सहा दिवसांपासून लाखों शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. शांततेच्या मार्गाने सुरू असलेले आंदोलन दडपण्याचा केंद्र सरकारने प्रयत्न चालवला आहे. पण शेतकरी केंद्र सरकारला भीक घालणार नाही. पंतप्रधानांना देशभर भाषणे करायला वेळ आहे, इव्हेंट करायला वेळ आहे. पण अन्नदात्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे. आता शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका. महाराष्ट्रातील शेतकरी संपूर्ण ताकदीनीशी दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. या आंदोलनावर व कृषी विधेयकावर केंद्र सरकारने तीन दिवसात तोडगा काढला नाही, तर महाराष्ट्रातही या आंदोलनाचा मोठा भडका उडेल,’ असा इशारा त्यांनी दिला