सोलापूर : महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर आणि शेठ लोणकरणजी जगन्नाथजी चंडक ट्रस्टतर्फे आयोजित शेठ लोणकरणजी जगन्नाथजी चंडक स्मृती व्याख्यानमाला रविवार (दि.१७) पासून सुरु होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त किशोर चंडक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
१७, १८ आणि १९ रोजी दररोज सायंकाळी ठिक ६ वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या ॲम्फी थिएटरमध्ये ही व्याख्यानमाला चालणार आहे. व्याख्यानमालेचे यंदाचे २७ वे वर्ष असून यंदाच्यावर्षीही सोलापूरकरांना उत्तम उत्तम व्याख्यानांची मेजवानी मिळणार आहे.
व्याख्यानमालेचे पहिले पुष्प विद्या देवधर (हैद्राबाद) या गुंफणार असून ‘कायदे निर्मितीत स्त्रियांचे योगदान’ या विषयावर त्या मार्गदर्शन करतील. व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी राजेंद्र घाडगे (सातारा) ‘महाराणी ताराबाई : वाटचाल आणि राजनैतिक धोरण’ या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान देतील.
कवी आणि अभ्यासक गोविंद काळे (सोलापूर) यांच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे प्रशासन’ या विषयावरील मार्गदर्शनाने शेठ लोणकरणजी जगन्नाथजी चंडक स्मृती व्याख्यानमालेचा समारोप होणार आहे. सोलापूरकरांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन लोणकरणजी जगन्नाथजी चंडक चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव डॉ. गिरीश चंडक यांनी यावेळी केले.
या पत्रकार परिषदेस लोणकरणजी जगन्नाथजी चंडक चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव डॉ. गिरीश चंडक, विश्वस्त किशोर चंडक, महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर शाखेच्या अध्यक्षा डॉ. श्रुतीश्री वडगबाळकर, उपाध्यक्ष दत्ता सुरवसे, प्रमुख कार्यवाह मारुती कटकधोंड, कार्यवाह राजेंद्र भोसले, कार्यकारिणी सदस्य ॲड. जे. जे. कुलकर्णी, गोविंद काळे, फैय्याज शेख उपस्थित होते.