पुणे : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या मैत्रीचे अनेक किस्से आपण वाचले असतील. दोघांची मैत्री राजकारणाच्या पलिकडची आहे. त्यांच्या मैत्रीसंदर्भातच आज शरद पवारांनी एक किस्सा सांगितला आहे. पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी म्हटलं की, सुशीलकुमार शिंदे यांनी माझ्या सांगण्यावरुन पोलीस खात्यातील नोकरी सोडली. मी त्यांना पोटनिवडणुकीत आमदारकीचे तिकीट मिळवून देतो असे आश्वासन दिले. पण तिकीट मिळवून देऊ शकलो नाही, तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले, असं ते म्हणाले. मी त्या सरकारमध्ये गृहमंत्री झालो. शिंदे कायद्याचे पदवीधर असल्याने मी त्यांना सरकारी वकील बनवले. आपल्या ज्या काही केसेस असतील तर त्या शिंदेंना द्यायचे ठरले. पुढे त्यापुढील निवडणुकीत शिंदेंना तिकीट मिळवून देण्यात आम्ही यशस्वी झालो. त्यानंतर त्यांनी मागे बघून पाहिल नाही, असंही शरद पवार म्हणाले.
‘पुण्यामध्ये जेवढे पुरस्कार दिले जातात, तेवढे देशातील कुठल्याच शहरात दिले जात नाहीत’
शरद पवार म्हणाले की, पुण्यामध्ये जेवढे पुरस्कार दिले जातात, तेवढे देशातील कुठल्याच शहरात दिले जात नाहीत. पुरस्कार देणारे, पुरस्कार ठरवणारे आणि पुरस्कार स्वीकारणारे लोक ठराविकच असतात. रघुनाथ माशेलकर, प्रतापराव पवार ही नावे पुरस्कार मिळवणार्या लोकांमध्ये असतातच. पुरस्कार ठरवणारे देखील उल्हास पवार, अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला हे लोक असतात.