सोलापूर : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे जीवन तत्त्वज्ञानाने समृद्ध होते. त्यांच्या अनेक पैलूंचा धांडोळा ‘शैलीकार यशवंतराव’ या ग्रंथात घेण्यात आला आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. तुळजाभवानी महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. शिवाजीराव देशमुख यांच्या ‘शैलीकार यशवंतराव’ या ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीचे आणि ‘कथात्म साहित्य : विमर्श व विवेचन’ या संदर्भीय सेवा गौरव ग्रंथाचे प्रकाशन बुधवारी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे होते. तर यावेळी व्यासपीठावर प्रा. कौसल्या देशमुख, रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, तुळजाभवानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, हिराचंद नेमचंद वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर, सोलापूर जिल्हा सामाजिक कार्य समितीचे अध्यक्ष उल्हास पाटील, कविवर्य रा. ना. पवार प्रतिष्ठानचे माधव पवार उपस्थित होते.
सोलापूर जिल्हा सामाजिक कार्य समिती, कविवर्य रा. ना. पवार प्रतिष्ठान यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रा. डॉ. शिवाजीराव देशमुख यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सपत्नीक सत्कार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते मानपत्र देऊन करण्यात आला.
श्री. शिंदे म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांच्या ‘ कृष्णाकाठ ‘ या पुस्तकाचे प्रकाशन करण्याचा योग मला आला होता. यशवंतराव चव्हाण यांची भूमिका, वैचारिक, सामाजिक नेतृत्व, प्रथितयश राजकारणी म्हणून त्यांनी केलेले कार्य यांची विस्तृत मांडणी प्रा. डॉ. शिवाजीराव देशमुख यांनी या पुस्तकात केली आहे, असेही सुशीलकुमार शिंदे म्हणाले.
प्रा. डॉ. शिवाजीराव देशमुख म्हणाले,
यशवंतराव चव्हाण हे चालते बोलते विद्यापीठ होते. यशवंतराव चव्हाण यांची संवेदनशीलता, सर्जनशीलता मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे. त्यांच्या विचारांची पारायणे करण्याची आवश्यकता आहे. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमुळे माजी सर्वांगीण प्रगती झाली. वाचन माणसाला अंधारातून प्रकाशाकडे, असत्याकडून सत्याकडे नेते, असेही प्रा. डॉ. देशमुख म्हणाले. प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अरविंद हंगरगेकर यांनी सूत्रसंचालन तर कवी माधव पवार यांनी आभार प्रदर्शन केले.