मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्याने राज्याचं राजकारण चांगलच तापलं. विरोधक तसेच सत्ताधाऱ्यांनी सदर घटना योग्य नसल्याचे म्हटले. शाईफेक झाल्यानंतर या प्रकरणात मनोज घरबडेसह अन्य तीन व्यक्तींना अटक करण्यात आली होती. या तिघांना आता न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी महापुरुषांवर केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. अशात पुण्यातच त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. या शाईफेकीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात स्पष्ट दिसत आहे की, त्यांच्या चेहऱ्यावर शाईफेक करण्यात आली आहे. मात्र तरी देखील दोषींवर ३०७ कलमासह अन्य मोठी कलमे लावण्यात आली आहेत.
शनिवारी शईफेकीची घटना घडली त्यानंतर लगेच आरोपींना ताब्यात घेण्यात आले. तिघांविरोधात ३०७ कलम लावल्याने विरोधक चांगलेच संतापले होते. ३०७ कलम खुनाचा प्रयत्न केल्यास लावले जाते. मात्र प्रत्यक्ष घटना तशी नसून पाटलांवर फक्त शाईफेक करण्यात आली होती. त्यामुळे यात कुठेही खुनाचा प्रयत्न नसून लावण्यात आलेली कलमे चुकीची असल्याचे विरोधकांनी म्हटले. त्यानंतर मंगळवारी ३०७ कलम कमी करण्यात आले होते.