मुंबई: अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने शनिवारी रात्री रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईत बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आले आहे. काल रात्री झालेल्या कारवाईनंतर एनसीबीने आर्यन खानचे नाव गुप्त ठेवले होते. मात्र, आता आर्यन खानसह आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर आणि गोमित चोप्रा यांचा समावेश आहे.
एनसीबीने रात्रभर या सगळ्यांची कसून चौकशी करुन त्यांचे जबाब नोंदवले आहेत. आता थोड्याचवेळात या सगळ्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली जाईल. त्यानंतर आर्यन खानसह आठ जणांची वैद्यकीय चाचणी करुन त्यांना किला कोर्टात हजर करण्यात येईल. यावेळी आर्यन खानची रवानगी पोलीस कोठडीत होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.