नवी दिल्ली : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय नागरिकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया DCGI चे संचालक व्हीजी सोमाणी यांनी सीरमच्या covishield, भारत बायोटेकच्या Covaxin लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. शनिवारीच कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींना तज्ज्ञ समितीनं मान्यता दिली होती. ज्यानंतर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात DCGI कडून आज परवानगी मिळाली आहे. सोबतच कॅडीलाच्या लसीला तिसऱ्या टप्प्यातल्या क्लिनिकल ट्रायल करायलाही परवानगी देण्यात आली आहे.
कोवॅक्सिनच्या आपत्कालीन वापराबाबतच्या संमतीसाठी तज्ज्ञ समितीनं शिफारसही केली होती. कोवॅक्सिन ही भारत बायोटेकद्वारा विकसित केलेली देशी लस आहे. अशा प्रकारे तज्ज्ञ समितीने मंजूर केलेली ही दुसरी लस आहे. यापूर्वी, ऑक्सफोर्डच्या लसीला तज्ज्ञ समितीनं मान्यता दिली होती.
DCGI शी संलग्न अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार त्यांच्याकडून जेव्हा कोणत्याही औषधास मान्यता मिळते, तेव्हा त्या कंपनीला CT23 अर्थान परवानगी मिळते. ज्यानंतर औषधाची निर्मिती ज्या राज्यात केली जात आहे ते राज्य स्टेट ड्रग रेगुलेटरी अथॉरिटीकडे जाऊन ड्रग एंडोर्समेंटची मागणी करतं. ज्यानंतर हे औषध रोल आऊट होतं. या प्रक्रियेसाठी 4-5 दिवसांचा कालावधी लागू शकतो.