सोलापूर, दि. २३- कुंभारवेस, व विजयपूर येथील श्री किरिटेश्वर संस्थान मठाचे मठाधिपती श्री वेदांताचार्य विद्यावाचस्पती श्रीमनिप्र लिं. मृत्युंजय महास्वामी यांच्या ३५ व्या पुण्यस्मरणोत्सवानिमित्त ३ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मठाधिपती पूज्य स्वामीनाथ महास्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रविवारी ३ नोव्हेंबर रोजी अध्यात्मिक प्रवचनाला सुरुवात होणार असून प्रवचनकार पूज्य प्रशांत देवरू कोंडगुळी हे प्रवचन सांगणार असून दररोज सायंकाळी ६ वाजता कुंभारवेस येथील किरीटेश्वर मठामध्ये प्रवचन होणार आहे.
शुक्रवारी ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता लिं. श्री मृत्युंजय महास्वामी यांच्या समाधीला महारुद्राभिषेक, जंगम पाद्यपूजा होणार आहे. त्यानंतर दुपारी १२:०४ वाजता सामूहिक विवाह सोहळा होणार असून महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी डॉ. पूज्य श्रीमनिप्र मल्लिकार्जुन महास्वामी, म. नि. प्र. डॉ. शिवानंद महास्वामी, म.नि.प्र मुरघेंद्र महास्वामीजी, म. नि. प्र प्रभूशांत महास्वामी, म.नि.प्र बसवलिंग महास्वामी, म.नि. प्र प्रभूराजेंद्र महास्वामी, म . नि.प्र सिद्धलिंग महास्वामी, म. नि. प्र. मृत्युंजय महास्वामी, म. नि. प्र. वीरतेश्वर महास्वामी, चरमूर्ती देवरु महांतेश्वर मठ, पूज्य विश्वराध्य देवरु काडसिद्धेश्वर, सिद्धेश्वर देवस्थानचे चेअरमन धर्मराज काडादी, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, माजी नगरसेवक केदार उंबरजे, माजी सभागृह नेते सुरेश पाटील, विजया बाळय्या हिरेमठ, शिवयोगी स्वामी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यंदाचे हे २१ वे वर्ष असून, या विवाह सोहळ्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या वधू-वरांची नोंदणी करणे आवश्यक असून, श्री किरीटेश्वर संस्थान मठ, कुंभार वेस, येथे व श्रीमनिप्र स्वामीनाथ महास्वामी ९४२२४६१४३७ या भ्रमणध्वनीवरती संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.