नागपूर : नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गाच्या पाहिल्या टप्प्याच्या लोकार्पणाला जेमतेम पाच दिवस उलटून गेले आहेत. या महामार्गावरून वाहतूक सुरूही झाली. या पाचच दिवसांत या महामार्गावर एकट्या बुलढाण्यात पाच अपघात झालेत. सुदैवानं या अपघातात जीवित हानी झाली नसली तरी होणारे हे अपघात मात्र चिंतेची बाब असल्याचं समोर येत आहे. नेमके हे अपघात का होतायत? अपघाताची नेमकी कारणं काय आहेत? याचा शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे.
विदर्भ आणि मुंबईला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात समृद्धी येईल, असं म्हंटलं जात होतं. पण गेल्या रविवारी या महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या 510 किमीच्या टप्प्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं. या महामार्गावरून वाहतूक सुरूही झाली. खरं तर या महामार्गाची रचना 150 किमी प्रतितास या वेगानं वाहनं धावू शकतील, अशी तयार करण्यात आली आहे. पण याठिकाणी 120 किमी प्रतितासाची वेग मर्यादा असल्यानं यावर फक्त याच वेगात वाहनं चालविण्याची मुभा आहे.