सर्वांनाच नारळाच्या आश्चर्यकारक आणि आपल्या आरोग्यासाठीच्या फायद्यांबद्दल माहिती असेलच. एशियन पॅसिफिक कोकोनट कम्युनिटीच्या (APCC) स्थापनेच्या स्मरणार्थ दरवर्षी २ सप्टेंबर रोजी जागतिक नारळ दिन अर्थात World Coconut Day साजरा केला जातो. APCC चं मुख्यालय हे जकार्ता इंडोनेशिया येथे आहे. भारतासह सर्व प्रमुख नारळ उत्पादक देश APCC चे सदस्य आहेत. पण २ सप्टेंबर हा दिवस जागतिक नारळ दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय नेमका का घेतला गेला? याविषयी जाणून घेण महत्त्वाचे आहे.
जागतिक नारळ दिन हा फक्त नारळाचा नाही तर त्याचं उत्पादन करणाऱ्या लोकांसाठी देखील महत्त्वाचा आहे. आपल्याकडे नारळाची लागवड करणाऱ्या उत्पादकांना येणाऱ्या अडचणींविषयी फारशी जागरूकता नाही. APCC चे सदस्य असलेल्या देशांतील नारळ उत्पादक गरिबी आणि इतर अनेक आव्हानांचा सामना करतात. भारताचा विचार करायचा झाला तर या उत्पदकांना चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तींना सामोरं जावं लागतं. त्याचसोबत, आपल्या उत्पादनासाठी किमान किंमत मिळवणं हे देखील त्यांच्यासाठी मोठ आव्हानात्मक काम आहे.
नारळ उद्योग हा संथ आणि स्थिर गतीने वाढत आहे. या उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक गोष्टी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. यामध्ये छोट्या शेतकरी आणि उत्पदकांना प्रोत्साहित करणं आणि गुंतवणुकीच्या अधिक संधी निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे. नारळ उद्योगाची वाढ म्हणजे त्याच्याशी निगडित प्रत्येक घटकाची वाढ आहे. यामुळे अनेक उत्पादक/शेतकरी कुटुंबांना गरिबीचा सामना करण्यास मोठी मदत होईल.
पहिल्यांदा कधी साजरा झाला?
जागतिक नारळ दिन २००९ मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी शेतकरी, तज्ज्ञ आणि व्यवसाय मालक मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा करतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर नारळाविषयी जागरूकता वाढवणं हे या दिवसाचं मुख्य उद्दिष्ट आहे. नारळाबद्दल वाढलेली जागरूकता शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची योग्य किंमत मिळण्यास आणि पुरवठा आणि मागणीमधील तफावत दूर करण्यास निश्चित मदत करेल. त्याचप्रमाणे नारळ उद्योग वाढण्यास याची मदत होईल.
नारळाचे फायदे
नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष आणि नारळाला आपण श्रीफळ म्हणतो. नारळाच्या झाडाचा असा एकही भाग नाही कि जो उपयोगी ठरत नाही. यावरून आपल्याला त्याचं महत्त्व किती मोठं आहे हे लक्षात येतच. नारळ हा व्हिटॅमिन, पोटेशियम, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि खनिजांनी समृद्ध असतो. आपल्या शरीरासाठी देखील त्याचे अनेक चमत्कारिक फायदे आहेत.
उन्हाळ्यात नारळाच्या पाण्यासारखा दुसरा उत्तम पर्याय नाही. हे शरीरातील ग्लूकोजची पातळी चांगली ठेवून शरीराला हायड्रेटेड ठेवत.
पोटाच्या अनेक समस्यांपासून आराम देतं. नारळाच्या पाण्याने पोट्यातील जळजळ, अल्सर, कोलायटिस, आतड्यांमधील जळजळ कमी होते.
नारळाच्या पाण्यात असलेल्या व्हिटॅमिन-सी, मॅग्नेशियम, पोटॅशियमसारख्या पोषक घटकांमुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
नारळात ६१% फायबर असतं. हे आपल्या स्मरणशक्तीला वाढविण्यास देखील मदत करतं.
नारळाचे तेल स्वयंपाकासाठी सर्वात चांगलं आणि सुरक्षित मानलं जातं.
त्याचसोबत नारळाच्या तेल आपल्या केसांना अधिक निरोगी आणि चमकदार बनण्यास मदत करतं.
नारळ पाण्याला दररोज आपल्या चेहऱ्यावर लावल्याने मुरूम आणि डाग बरे होतात.