सोलापूर :- होटगी रोड येथील विमानतळाची सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोचे अधिकारी दिनांक 13 व 14 ऑगस्ट रोजी सोलापूर येथे दाखल झालेले आहेत. ते विमानतळावरील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून असलेल्या विविध बाबीची अत्यंत बारकाईने तपासणी करत असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांना काही त्रुटी निदर्शनास आलेल्या असून त्याची पूर्तता करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाला सुचित करण्यात आलेले आहे.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर विमानतळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोचे अधिकारी यांच्याशी विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून असलेल्या विविध बाबीवर चर्चा केली. येथील विमानतळावरून नागरी विमान सेवा सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासन व विमानतळ प्राधिकरण करत असलेल्या कामकाजाची माहिती त्यांनी दिली. यावेळी सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, सोलापूर विमानतळ प्राधिकरणाचे चॅम्पला बनोथ व महापालिकेचे अधिकारीही उपस्थित होते.
ब्युरो ऑफ सिविल एव्हिजन सिक्युरिटी (नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो) च्या अधिकाऱ्यांनी होटगी रोड सोलापूर विमानतळाची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध पातळीवर अत्यंत काटेकोरपणे तपासणी केली. यावेळी सुरक्षा विरोच्या अधिकाऱ्यांना सोलापूर विमानतळ प्राधिकरणा कडून सुरक्षेच्या दृष्टीने काही किरकोळ बाबी राहिलेल्या असून त्याची पूर्तता करण्याबाबत त्यांनी निर्देशित केलेले आहे. विमानतळ प्राधिकरण कडून सुरक्षेच्या बाबीची पूर्तता केल्यानंतर पुन्हा ब्युरो ऑफ सिविल एव्हिएशन सिक्युरिटी चे अधिकारी तपासणीसाठी येणार आहेत.
त्यानंतर डीसीएएस चे अधिकारी तपासणीसाठी विमानतळाला भेट देतील त्यांची पाहणी झाल्यानंतर त्यांच्या कडून प्रमाणपत्र मिळेल व त्यानंतर सोलापूर विमानतळ येथून विमानसेवा सुरू होण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.