जैवशास्त्र संकुल व सूक्ष्म जीवशास्त्र विभागाचे उद्घाटन
सोलापूर, दि.6- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात नव्याने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू झालेल्या जैवशास्त्र संकुलातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागात कोरोना विषाणूची तपासणी व लसबाबत अभ्यास व संशोधनासाठी लागणारे शास्त्रज्ञ भविष्यात तयार होतील, असा विश्वास कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केला.
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात जैवशास्त्र संकुल व सूक्ष्म जीवशास्त्र विभागाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा हे होते. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. विकास घुटे, मानव विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. विकास कदम, रसायनशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. आर. बी. भोसले, भौतिकशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. व्ही. बी. पाटील, सामाजिकशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. जी. एस. कांबळे, प्राचार्य डॉ. शंकर नवले, डॉ. ए. बी. सूर्यवंशी, डॉ. एस. एस. सूर्यवंशी, प्राचार्य डॉ. व्ही. पी. उबाळे, प्राचार्य डॉ. पी. आर थोरात, डॉ. अभिजित जगताप, डॉ. एस. के. पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या, विद्यापीठात यंदा नवीन वीस अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. त्यात सूक्ष्मजीवशास्त्र हा एक नवीन महत्त्वपूर्ण अभ्यासक्रम आहे. कोरोना महामारीच्या कठीण काळात देखील विद्यापीठ प्रशासनाने जैवशास्त्र संकुल व सूक्ष्मजीवशास्त्र विभागाची उभारणी केली. या संकुलाची व सूक्ष्म जीवशास्त्र प्रयोगशाळेची खूप गरज होती. ती गरज ओळखून विद्यापीठ प्रशासनाने संकुल सुरू करण्याचा निर्णय घेतला. पूर्ण क्षमतेने प्रवेश प्रक्रिया ही झाली आहे. याचा निश्चितच विद्यापीठास व सोलापूरच्या विकासासाठी फायदा होईल, असा विश्वास कुलगुरु डॉ. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
प्र-कुलगुरू डॉ. मिश्रा म्हणाले की, विद्यापीठात सुरू झाले जैवशास्त्र संकुल व सूक्ष्मजीवशास्त्र विभाग कोरोना सारख्या साथीच्या रोगांवर संशोधन करण्यास भविष्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विद्यापीठात प्रथमच हा विभाग सुरू होत असल्याचा आनंद व्यक्त करून त्यांनी विद्यापीठाच्या प्रगतीसाठी सूक्ष्मजीवशास्त्र विभागाची भूमिका अनन्यसाधारण राहणार असल्याचे मत स्पष्ट केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. एस. एन. सुरवसे व सहायक प्राध्यापिका स्मिता साबळे यांनी केले. आरती हुल्ले यांनी आभार मानले.