सोलापूर : शेतकऱ्यांच्या नापीक जमिनी सुपीक करणारी गाळ काढण्याची योजना आहे, जरी पावसाळ्याच्या तोंडावर याचे काम सुरू झाले असले तरी प्रतिसाद चांगला आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या हिताची असून शेतजमिनीला नवी संजीवनी देणारी आहे. प्रत्येक जिल्ह्यात शासकीय यंत्रणे कडून धरण अथवा तलावातील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, असे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी केले.
सरकारची महत्त्वाकांक्षी व शेतकऱ्यांना संजीवनी देणारी गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार २.० या योजनेचा शुभारंभ राज्यभरात झालेला आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा मानला जात असलेला एकरूख तलावामध्ये गाळ काढण्यास सुरुवात झाली आहे. त्या ठिकाणी आमदार सुभाष देशमुख यांनी शनिवारी भेट दिली. यावेळी उपजिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, तहसीलदार सैफन नदाफ, जलसंधारण विभागाचे उप अभियंता व्ही एन होनमुटे, प्रल्हाद कांबळे यांनी भेट देत, सर्वत्र पाहणी केली.
या तलावातून दिवस रात्र गाळ काढला जात असून सुमारे २ पोकलन ४ जेसीबी, २० ट्रॅक्टर, २५ हायवाच्या माध्यमातून दिवसाला साडेतीन हजार घनमीटर गाळ उपसा केला जात आह. यावेळी परिसरातील दत्तात्रय खंडागळे, नंदकुमार खंडागळे, दाजी कोले, मनोज गुंड, सुरेश डांगे, उत्तम शिंदे, दिगंबर मिसाळ, सचिन शिंदे, तुकाराम शिंदे, बळीराम कादे हे शेतकरी उपस्थित होते.
यावेळी आमदार देशमुख यांनी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांचा सत्कार करत होते पण ठोंबरे यांनी तो नाकारला तेव्हा आ. देशमुख यांनी कल्पना सुचवली की आपण एक जेसीबी चालक एक डंपर चालक आणि एक गाळ नेणारा शेतकरी यांचा सत्कार करू तेव्हाही संकल्पना सर्वांनाच आवडली आणि येथे उपस्थित या तिघांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी सांगितले, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेला शेतकऱ्यांचा सोलापूर जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. जिल्ह्यात ९९ ठिकाणी गाळ काढण्यासाठी कामे अंतिम केले असून त्यापैकी २५ कामे हाती घेण्यात आले आहेत. आजपर्यंत १.५० लक्ष टीसीएम गाळ काढण्यात आला आहे. ७५ हेक्टर क्षेत्र सुपीक केले असून शासनाच्या धोरणानुसार विधवा, माजी सैनिक, अल्पभूधारक यांना हेक्टरी ३७ हजार ५०० रुपये गाळ वाहून नेण्याचे अनुदान देण्यात येते. शेतकऱ्यांची अनुदान वाढीव मागणी आहे परंतु शासनाच्या धोरणानुसार राबवली जाईल असे त्यांनी सांगितले.