सोलापूर – शासनाच्या निर्देशानुसार उत्तर सोलापूर तालुक्यातील ग्रामीण रस्ते, हद्दीचे रस्ते, गाडीमार्ग, पायवाटा व शेत पांदण रस्त्यांची नोंद अद्ययावत करणे, अतिक्रमण हटविणे व रस्त्यांना क्रमांक देण्याच्या कार्यवाहीसाठी निश्चित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही मोहिम टप्प्याटप्याने राबवली जाणार असून, तहसीलदार उत्तर सोलापूर यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत.
कार्यवाहीचे वेळापत्रक:
दि. १० ते १२ सप्टेंबर – शिवारफेरी, गाव नकाशावर नोंद असलेले व नसलेले रस्ते शोधून प्राथमिक यादी तयार करणे (प्रपत्र १ व २)
दि. १३ ते १४ सप्टेंबर – यादी ग्रामसभेत मांडणे, मान्यता घेणे व ठराव करणे
दि. १५ सप्टेंबर – मंजूर यादी तहसीलदाराकडे सादर करणे
दि. १६ सप्टेंबर – उपअभिलेख अधिकारीमार्फत रस्त्यांचे मोजमाप व सीमांकन (Geo Referencing सह)
दि. १७ ते १८ सप्टेंबर – प्रत्यक्ष पाहणी, अतिक्रमण असल्यास नोटीस बजावणे व सुनावणी
दि. १९ ते २० सप्टेंबर – अतिक्रमण हटविणे व आवश्यकतेनुसार पोलीस मदत
दि. २१ सप्टेंबर – अद्ययावत अभिलेख तयार करणे व गाव नमुना १ फ मध्ये नोंदी करणे
दि. २२ सप्टेंबर – रस्त्यांना विशिष्ट क्रमांक देणे (प्रपत्र ४) व गाव दप्तरात नोंद
दि. २२ सप्टेंबर – ग्राम रस्ता आराखडा समिती व तालुकास्तरीय समितीची आढावा बैठक व जिल्हाधिकारी कार्यालयात अहवाल सादर
विशेष सूचना:
- सर्व कामकाज निश्चित कालमर्यादेत पूर्ण करणे बंधनकारक राहील
- विलंब झाल्यास जबाबदार अधिकारी/कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही केली जाईल
- ग्राम रस्ता आराखडा समिती व तालुकास्तरीय समितीमार्फत प्रत्येक टप्प्याचा दैनंदिन प्रगती अहवाल तहसील कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक
या मोहिमेमुळे तालुक्यातील रस्त्यांची अचूक नोंद, अतिक्रमणमुक्ती व प्रशासकीय पारदर्शकता सुनिश्चित होणार आहे. नागरिकांनी व स्थानिक प्रशासनाने सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार निलेश पाटील यांनी केले आहे.