येस न्युज मराठी नेटवर्क : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी १७ सप्टेंबरला देशभरात २.५ कोटी लोकांना लस देत नवा रेकॉर्ड करण्यात आला. मात्र या आकडेवारीमध्ये गडबड असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. याचं कारण त्या दिवशी लस नोंदणीमध्ये त्रुटी समोर आल्या आहेत. यामधील काही प्रकार तर आश्चर्यकारक आहेत. अनेकांना तर करोनाची लस घेतली नसतानाही लसीकरण प्रमाणपत्र देण्यात आलं आहे.
भोपाळमध्ये राहणाऱ्या आशुतोष शर्मा यांना १७ सप्टेंबरला रात्री ८ वाजता मोबाइलवर एक मेसेज आला. “विद्या शर्माजी, १७ सप्टेंबरला भारताने लसीकरणाचा नवा रेकॉर्ड केला त्याच दिवशी तुम्हाला कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस यशस्वीपणे देण्यात आला,” असं या मेसेजमध्ये लिहिण्यात आलं होतं. विद्या शर्मा या आशुतोष शर्माच्या आई आहेत. मात्र यामध्ये एकच समस्या होती ती म्हणजे, चार महिन्यांपूर्वीच विद्या शर्मा यांचं करोनामुळे निधन झालं होतं. त्यामुळे आशुतोष शर्मा यांना धक्काच बसला. त्यांनी आईच्या नावे आलेलं लसीकरण प्रमाणपत्र डाऊनलोड करुन सेव्हदेखील केलं आहे.