सोलापूर : महिलांच्या शिक्षणाच्या ध्येयाने प्रेरित होऊन सावित्रीबाई त्या क्षेत्रात काम करत राहिल्या. शिक्षण क्षेत्रातील योगदान पाहून १८५२ ला ब्रिटीश शासनाने त्यांचा यथोचित गौरव केला. तसेच सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून ३ जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिन “बालिका दिन’ म्हणून साजरा केला जातो.
सावित्रीबाईंनी आपलं संपूर्ण आयुष्य महिलांना शिक्षण देण्यासाठी, सर्व क्षेत्रांत महिलांचा ठसा उमटवण्यासाठी, महिलांना शिक्षित करण्यारिता आणि त्यांचे हक्क मिळवून देण्याकरता खर्ची घातले. महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणताना सावित्रीबाईंना संघर्ष करावा लागला. परंतु त्यांनी हार मानली नाही. धैर्य खचू न देता आत्मविश्वासाने संघर्षाला सामोरे गेल्या आणि यश मिळवलेच. त्यांच्या यशामागे त्याग, कष्ट, संघर्ष , पराकाष्ठा आहे. सावित्रीबाईंचा विवाह वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. विवाहानंतर त्यांच्या जीवनाची क्रांतिज्योत पेटली.
ज्योतिबांनीच सावित्रीबाईंना शिक्षित केले. त्याकाळात स्त्रियांना शिक्षणाला अनुमती नसल्याने सावित्रीबाईंच्या शिक्षणाला समाजाकडून विरोध झाला. जुन्या चालीरीतींचा पगडा आणि समाजाच्या भीतीने ज्योतिबांच्या घरच्यांनी दोघांना घराबाहेर काढले; परंतु त्यांनी सावित्रीबाईंचे शिक्षण सुरूच ठेवले.
सावित्रीबाईंनी कवयित्री म्हणून समाजालादेखील प्रबोधित केले. त्यांनी काव्यफुले, बावनकशी सुबोधरत्नाकर अशा काव्य रचना केल्या. त्यांची एक ‘तयास मानव म्हणावे का?’ही काव्यरचना मला फार आवडते. सावित्रीबाईंनी सांगितल्याप्रमाणे आपण मानवी जीवन सुखी करण्यात खूपच व्यस्त झालो आहोत. आपल्याला समाजकल्याणाचे भान राहिले नाही. सामाजिक कर्तव्याची भूमिका आपण सोडून देत चाललो आहोत. त्यांचे विचार व कर्तृत्वाने प्रत्येक स्त्रीने वाटचाल करण्याची गरज आहे.
पुनम पाटील, शिक्षिका
{ठोकळ प्रशाला इंदिरा नगर विजापूर सोलापूर}