सोलापूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई व सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे १०० व्या नाट्य संमेलन निमित्ताने घेण्यात आलेल्या जागर नाट्यकलेचा या स्पर्धेतील नाट्यसंगीत पद गायन या स्पर्धेत श्री वेणुगोपाल संगीत विद्यालयाचा विद्यार्थी सार्थक बावीकर याने प्रथम क्रमांक पटकावला. सोमवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह माटुंगा येथे या स्पर्धा पार पडल्या.
महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर झालेल्या प्राथमिक फेरीतून निवड झालेले २१ स्पर्धक या अंतिम फेरीत सहभागी झाले होते. या स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ गायक व नाट्य कलाकार मधुवंती दांडेकर, शुभदा दादरकर व ज्ञानेश पेंढारकर यांनी केले. यावेळी सार्थक यास २५ हजार रुपयांचा धनादेश, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह परीक्षकांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ नाट्यकलाकार विजय गोखले, सविता मालपेकर, नाट्य परिषदेचे अजित भुरे, सतीश लोटके, स्पर्धा प्रमुख बांदिवडेकर उपस्थित होते. या स्पर्धेसाठी सार्थक यास शर्वरी कुलकर्णी व झंकार कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.
जागर नाट्यकलेचा अंतिम स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या सार्थक बावीकर यास सन्मानपूर्वक पारितोषिक प्रदान करताना विजय गोखले, शुभदा दादरकर, सविता मालपेकर, मधूवंती दांडेकर व नाटय परिषदेचे पदाधिकारी.