शून्यातून विश्व उभारलेल्या कर्तुत्ववान महिलांची जाणून घेतली यशोगाथा
सोलापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी गुरुवारी उद्योगवर्धिनी संस्थेस सदिच्छा भेट दिली. यावेळी संस्थेच्या कार्याची माहिती घेऊन त्यांनी महिला सक्षमीकरणाच्या या प्रकल्पाचे कौतुक केले. शून्यातून विश्व उभारलेल्या उद्योगवर्धिनीच्या कर्तुत्ववान महिलांची यशोगाथा त्यांनी जाणून घेतली.
प्रारंभी संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा चंद्रिका चौहान आणि संस्थेच्या महिला सेवाव्रतींच्या हस्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. यानंतर अध्यक्षा चंद्रिका चौहान यांनी उद्योगवर्धिनी संस्थेतर्फे चालणाऱ्या शिलाई, सेवापाथेय, शांतसंध्या, अन्नपूर्णा योजना, महिलांचे समुपदेशन, महिला रोजगार विषयक उपक्रमांची माहिती सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांना दिली.
उद्योगवर्धिनीने गेल्या २१ वर्षांमध्ये १० हजारांहून अधिक महिलांना संपर्क करून त्यांना व्यवसाय, रोजगार, समुपदेशनाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे. तसेच उद्योगवर्धिनीने आजपर्यंत ३५० उद्योजिका घडविल्या आहेत. याबद्दल सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत म्हणाले, महिलांचा आर्थिक पाया पक्का होणे आवश्यक आहे. आर्थिक स्वावलंबी होताना येणाऱ्या समस्यांवर उपाय शोधावा. स्त्री सक्षमीकरणाच्या कार्यातील प्रत्येक कृती आणि परिश्रम राष्ट्रासाठी असतील याची काळजी घेतली पाहिजे. माझे भले नाही झाले तरी चालेल पण राष्ट्राचे भले व्हावे, हा विचार प्रत्येकाच्या मनात रुजवण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव हेडगेवार, स्वामी विवेकानंद अशी जीवनचरित्रे आपल्यासाठी आदर्शवत असल्याचेही सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत म्हणाले.
यावेळी आनंद जोशी, कल्पेश जव्हेरी, सतीश मालू, उद्योगवर्धिनी संस्थेच्या सचिवा मेधा राजोपाध्ये, उद्योगवर्धिनीच्या उपाध्यक्षा शोभा श्रीवास्तव, खजिनदार वर्षा विभुते, संचालिका ॲड. गीतांजली चौहान, शांताबाई टाके, सुलोचना भाकरे, दिपाली देशपांडे, सिद्धरामय्या हिरेमठ, राजू गवळी, अजब सिंग तसेच उद्योगवर्धिनीच्या सेवाव्रती कार्यकर्त्या उपस्थित होत्या.