येस न्युज नेटवर्क : कोलकात्यात डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरण, बदलापुरातील चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरण, या दोन्ही घटनांनी देश पुरता हादरून गेला. अशातच बदलापूरची घटना ताजी असतानाच अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा गावातून अशीच एक संतापजनक घटना उजेडात आली आहे.
यात दुचाकीने गावी सोडण्याच्या बहाण्याने एसटी बसची वाट पाहत उभ्या असलेल्या एका 15 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना पुढे आली आहे. हे कृत्य गावच्या सरपंच पुत्राकडून झाले असून मार्डीच्या जंगलात नेत या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री 8.30 च्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा पोलिसांनी गुन्हा नोंदवून उशिरा रात्री त्या नराधमाला अटक केली. मात्र या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली आहे.
दुचाकीवर लिफ्ट देतो म्हणाला अन् थेट जंगलात नेत अत्याचार
या प्रकरणातील पीडित विद्यार्थी ही अमरावती येथील शाळेत नवव्या वर्गात शिकते आणि दररोज एसटी बसने ये-जा करते. शनिवारी सायंकाळी ती स्टँडवर एसटी बसची वाट पाहत उभी होती. याच दरम्यान अमरावती येथे आलेल्या सरपंच पुत्राने गावाच्या वाटेवर तिला हेरले. त्याने तिला गावी सोडण्यासाठी दुचाकीवर लिफ्ट देतो म्हणाला, तेव्हा विद्यार्थीनीने सुरुवातीला नकार दिला, मात्र त्यानंतर तिने मोबाईलवरून कुटुंबीयांना त्याच्यासोबत घरी येत असल्याची माहिती दिली. दरम्यान, गावापासून अवघ्या काही अंतरावर आरोपीने अचानक दुचाकी जंगलाच्या दिशेने वळवली. तो तिला गावाच्या मार्गातील जंगलात घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला. हे संपूर्ण प्रकरण उजेडात येताच याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली असून पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.