येस न्युज मराठी नेटवर्क : मंगळवेढा तालुक्यातील धर्म गाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक श्रीकांत ठेंगील आणि सरपंच आप्पासाहेब पाटील तसेच खाजगी इसम अरबाज अखिल शेख यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ व १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराने धरणगाव येथील जिल्हा परिषद शाळेत दोन वर्षांपूर्वी बचत गटातील महिलांना फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण दिले होते. त्यांचे 30 दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मानधन म्हणून धर्मगाव ग्रामपंचायतीकडून ९६,००० रुपये अदा करण्यासाठी सरपंच व ग्रामसेवकांनी सुरुवातीला २५,००० रुपयांची लाच मागितली व नंतर तडजोडी अंति १०,००० रुपये लाच घेण्याचे मान्य केले होते. तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक ब्यूरोचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील यांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. फौजदार चावडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.