वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर वाल्मिक कराडवर मकोकाही लावण्यात आलाय. त्यामुळे ‘ते माझ्या जवळचे आहेत’ हे उघडपणे सांगणाऱ्या धनंजय मुंडेंच्या राजकीय अडचणी वाढल्या आहेत. बीडच्या पालकमंत्रिपदापासून देखील धनंजय मुंडेंना मुकावं लागलं आहे. दुसरीकडे बीडमधील अनेक राजकारणी उघडपणे धनंजय मुंडेंच्या विरोधात एकवटले असताना सारंगी महाजन यांनी मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. सारंगी महाजन यांनी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर मुंडे बंधू-भगिणीवर जोरदार हल्लाबोल केलाय.
सारंगी महाजन म्हणाल्या, मला तर म्हणायचं आहे की, तुम्ही धनंजयला देखील आतमध्ये टाका. थोडे दिवस त्याला हवा खाऊद्या. सरकारी जेवण जेऊ द्या. बरं वाटेल. मुंडे बहीण भाऊ माणुसकीला काळिमा फासणारे लोक आहेत. त्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आलं पाहिजे. त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं पाहिजे. करोडो रुपये घेऊन कुठे जाणार आहेत हे? यांना फक्त सहा फुटाच्या पांढऱ्या चादरीवर जायचंय. सगळं इथे ठेवायचंय.
मुंडे साहेबांनी इतके वर्ष कमावलेली इज्जत त्यांनी घालवलेली आहे. याच्यामध्ये मुंडे साहेबांची मुलगी पुतण्या दोघेही जबाबदार आहेत.