एकेकाळी मुख्यमंत्री निवडून दिला, तरीही तालुका विकासापासून वंचित – माळकवठे येथील जनसन्मान सभेत वंचित चे संतोष पवार यांचा सवाल
माळकवठे (251-सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ): वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांच्या उपस्थितीत माळकवठे येथे आयोजित जनसन्मान सभेला ग्रामस्थांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. तालुक्याच्या विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करताना पवार यांनी विद्यमान राजकीय व्यवस्थेवर आणि भूतकाळातील घराणेशाहीवर जोरदार टीका केली.
“मुख्यमंत्री दिला, पण विकास नाही”
“सोलापूर जिल्ह्याने एकेकाळी राज्याला मुख्यमंत्री दिला, मोठ्या पदांवरही आपले लोक निवडून गेले, परंतु बारामतीसारख्या जिल्ह्याच्या तुलनेत सोलापूरचा विकास मात्र कधीच झाला नाही. तालुक्यातील MIDC प्रकल्प मंजूर झाला होता, मात्र तो राजकीय स्वार्थासाठी रद्द करण्यात आला. सिंचन क्षेत्राच्या वाढीवरही दुर्लक्ष झालं, अनेक प्रलंबित प्रकल्प आजही धुळखात पडले आहेत,” अशी टीका संतोष पवार यांनी केली.
जात-पात, धर्माचं राजकारण थांबवण्याचं आवाहन
“आजही जात-पात आणि धर्माच्या नावावर राजकारण चालतंय. हे थांबवून विकासाच्या मुद्यांवर चर्चा झाली पाहिजे. सामान्य माणसाच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना झाली पाहिजेत,” असे संतोष पवार यांनी ठामपणे सांगितले.
“प्रस्थापित घराण्यांची सत्ता आणि सामान्यांचा विकासाचा अभाव”
संतोष पवार यांनी प्रस्थापित राजकीय घराण्यांवर कडाडून टीका केली. “दर पाच वर्षांनी तीच घराणी आणि त्याच पारंपरिक चेहरे निवडणुकीत विकासाच्या गप्पा मारतात. मात्र त्यांची पार्श्वभूमी पाहिली तर तालुक्याचं राजकारण या ठराविक घराण्यांभोवतीच फिरताना दिसतं. सत्ताधारी असोत किंवा विरोधक, त्यांनी आलटून-पालटून सत्ता उपभोगली, मात्र सामान्य नागरिकांसाठी कोणतेही ठोस पावलं उचलली नाहीत,” असे पवार म्हणाले.
“परिवर्तनाशिवाय विकास शक्य नाही”
“तालुक्यातील हे चित्र बदलायचं असेल तर परिवर्तन घडवणं हाच एकमेव पर्याय आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी ‘गॅस सिलेंडर’ चिन्हावर मतदान करून वंचित बहुजन आघाडीला प्रचंड बहुमताने विजयी करा आणि तालुक्याला विकासाच्या मार्गावर नेण्याची संधी द्या,” असे पवार यांनी आवाहन केले.
सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद
सभेच्या शेवटी ग्रामस्थांनी संतोष पवार यांच्या भूमिकेला जोरदार पाठिंबा दिला. त्यांच्या परिवर्तनाच्या हाकेला प्रतिसाद देत, “यावेळी तालुक्यात परिवर्तन घडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचाच विजय निश्चित आहे,” असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
तालुक्याच्या विकासासाठी नव्या दिशेची आस
माळकवठे येथे पार पडलेल्या या सभेमुळे आगामी निवडणुकीत संतोष पवार आणि वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या पाठिंब्याचे चित्र अधिक स्पष्ट झाले आहे. तालुका विकासासाठी ग्रामस्थांनी परिवर्तनाची हाक दिली असून, यावेळी वंचितचाच गुलाल उधळणार, अशी भावना व्यक्त केली जात आहे.