श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या नामदेव पायरीची व नामदेव मंदिराची केली पाहणी
पंढरपूर (दि.21):-
संत शिरोमणी नामदेव महाराज परिवार व संत जनाबाई यांच्या षष्ठशतकोत्तर संजीवन समाधी सोहळा कार्यक्रम स्थळ, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संत नामदेव पायरी तसेच संत नामदेव मंदिरास ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भेट देऊन पाहणी केली.

यावेळी त्यांच्यासमवेत आमदार समाधान आवताडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, मुख्याधिकारी महेश रोकडे, पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके,श्री संत नामदेव क्षत्रिय एकसंघाचे अध्यक्ष महेश ढवळे, सचिव रुपेश खांडके, प्रदेशाध्यक्ष गणेश उंडाळे यांच्यासह शिंपी समाज बांधव उपस्थित होते.

संत शिरोमणी नामदेव महाराज परिवार व संत जनाबाई यांच्या षष्ठशतकोत्तर (675 वा) संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त संत नामदेव क्षत्रिय एकसंघ, श्री केशवराज संस्था पंढरपूर, संत नामदेव महाराज भक्त परिवार, नामदास महाराज परिवार, संत नामदेव शिंपी समाज पंढरपूर यांच्यावतीने श्रीक्षेत्र पंढरपूर येथे बुधवार दि. 23 व गुरुवार दि. 24 जुलै रोजी विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

संत शिरोमणी नामदेव महाराज परिवार व संत जनाबाई यांच्या षष्ठशतकोत्तर (675 वा) संजीवन समाधी सोहळा या नियोजित कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार असून त्यांच्या समवेत मंत्री महोदय, लोकप्रिनिधी, वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी तसेच मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन एल. आय. सी. कार्यालयासमोरील आरती मंडप, मनमाडकर हॉल येथे करण्यात येणार आहे. या ठिकाणची व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या नामदेव पायरी त्याचबरोबर संत नामदेव मंदिर येथे भेट देऊन पाहणी केली व दर्शन ही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतले. यावेळी संत नामदेव महाराज यांचे वंशज उपस्थित होते.