येस न्युज मराठी नेटवर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी शरद पवारांचे नेतृत्व सर्वांनी स्वीकारावं या संजय राऊत यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले तर वेगवान प्रगती होऊ शकते अशी कोपरखळी मारली आहे. कृषी आणि उद्योग क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाचा फायदा वेगवान प्रगतीत होईल असे सांगत राऊतांनी पवारांच्या मुख्यमंत्रिपदासाठी आग्रह करावा असेही मुनगंटीवार म्हणाले. ते चंद्रपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवरही टीका केली आहे.
महाविकास आघाडी सरकारला मजबूत करण्यासाठी आणि मोदींना हरवण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र यायला पाहिजे. शरद पवार हे नेतृत्व करू शकतात. ते सर्वमान्य नेते आहेत असं संजय राऊत म्हणाले होते. त्यांच्या या विधानाविषयी मुनगंटीवार यांना विचारलं असता शरद पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी संजय राऊतांनीच आग्रह करावा अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी चिमटे काढले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी अशोक चव्हाण यांना मराठा आरक्षणाच्या उपसमितीवरुन हटवा अशीही मागणी केली आहे.