येस न्युज मराठी नेटवर्क : पुढच्या दोन ते तीन महिन्यात भाजपचं सरकार येईल, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केल्यानंतर त्याला आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलंय. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात हे सरकार पाच वर्ष निश्चित पूर्ण करणार आहे. यांची पुढची चार वर्ष फक्त स्वप्न पाहण्यातच निघून जाणार आहेत, असंही संजय राऊत म्हणाले.
राज्यात जे ८० तासांचं सरकार स्थापन झालं होतं त्याची आज पुण्यतिथी आहे. आता त्यांना तीन महिन्यात सरकार स्थापन करायचं असेल तर शुभेच्छा. स्वप्न पाहण्यातच यांची चार वर्ष निघून जाणार आहेत, असा टोला राऊतांनी लगावला.
‘महाविकास आघाडीचं सरकार मजबूत असून आम्ही पाच वर्ष पूर्ण करणार आहोत. राज्यातील जनता महाविकास आघाडीसोबत आहे. संपूर्ण देशाचा विचार करता सर्वात मजबूत सरकार महाराष्ट्रात आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात सरकार चांगलं काम करत आहे’, असं संजय राऊत म्हणाले.