मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नव्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी संजय राऊत यांनी राज यांना कन्येच्या लग्नाची पत्रिका दिली. कौटुंबीक सोहळ्याच्या निमित्ताने राऊत यांनी राज यांची भेट घेतली असली तरी या भेटीमुळे पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन होता. त्यामुळे संजय राऊत आज शिवतीर्थावर सपत्नीक आले होते. शिवसेना प्रमुखांना अभिवादन केल्यानंतर राऊत यांनी थेट राज ठाकरे यांचं नवं घर गाठलं. राऊत यांच्या मुलीचं 29 नोव्हेंबर रोजी लग्न आहे. या लग्नाची पत्रिका देण्यासाठी राऊत सपत्नीक राज यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आले होते. यावेळी राज आणि राऊत यांच्यात मनमोकळ्या गप्पा झाल्या. ही कौटुंबीक भेट होती. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं सांगितलं जातं. मात्र, तरीही या भेटीने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.