येस न्युज मराठी नेटवर्क : पूजा चव्हाण प्रकरणामुळे कोंडीत सापडलेल्या वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत राठोड यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. विधिमंडळाचं अधिवेशन तोंडावर असतानाच भाजपानं संजय राठोड यांच्या यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत अधिवेशनात कामकाज चालू न देण्याचा इशारा दिला होता. तर उद्धव ठाकरे यांनीही राठोड यांना दोन दिवसांपूर्वीच निर्णय घेण्याचे आदेश दिले होते.बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर राठोड अडचणीत आले होते. पूजा चव्हाणसोबतचे फोटो आणि या प्रकरणाशी संबंधित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजपाकडून थेट राठोड यांच्यावर आरोप केला होता. तर राठोड यांनी पोहरादेवी येथे माध्यमांशी बोलताना चौकशीतून सगळं समोर येईल. आपली बदनामी केली जात असल्याचाही आरोपही त्यांनी केला होता. मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर असताना भाजपा नेत्यांनी राठोडांचा राजीनामा घेऊन कारवाई करण्याची मागणी केली होती.मुख्यमंत्री आणि संजय राठोड यांची भेट होण्याआधी सकाळी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ट्विट करत राजीनाम्यासंदर्भात अप्रत्यपणे संकेत दिले होते. त्यामुळे राठोड यांचा राजीनामा घेतला जाणार याबाबत खात्रीने बोललं जात होते.