मुंबई : समीर वानखेडे यांनी हायकोर्टात धाव घेतल्याचं पाहायला मिळत आहे. वानखेडे यांच्यावर झालेल्या आरोपानंतर राज्य सरकारकडून विशेष तपास पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी समीर वानखेडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतलीय. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी प्रकरणाचा तपास करत आहेत, अशावेळी एसआयटीची गरज काय? तसंच चौकशी करायची असेल तर सीबीआयमार्फत करण्यात यावी, अशी मागणी समीर वानखेडे यांनी याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात केलीय.
दरम्यान, समीर वानखेडे यांनी उचललेलं हे पाऊल अतिशय महत्वाचं मानलं जात आहे. कारण, यापूर्वी वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्त आणि पोलिस महासंचालकांना एक महत्वाचं पत्र लिहिलं होतं. त्यात मुंबई पोलिसांनी तपास सुरु केला तरी माझ्यावर कुठलीही कारवाई करण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, तरीही आता राज्य सरकारनं या प्रकरणाच्या तपासासाठी चार अधिकाऱ्यांच्या तपास पथकाची स्थापना केली आहे. एनसीबीच्या विरोधात ज्या काही तक्रारी आलेल्या आहेत त्या सगळ्यांची चौकशी आता एसीपी मिलिंद खेतले यांच्या नेतृत्वाखाली केली जाणार आहे.