सोलापूरः संतांनी आपल्या अभंगातून समाजप्रबोधन तर केलेच शिवाय काळाच्या पुढचे विचार मांडत भविष्यवाणी देखील केली असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. ते जागृती पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या ज्येष्ठ कवयित्री मनीषा कोठे यांच्या संतबोले या संग्रहाचे प्रकाशन करताना बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ कवी देवेंद्र औटी, जागृती पब्लिकेशनचे प्रमुख विजय गायकवाड, कवयित्री मनीषा कोठे, स्नेहा कोठे, सुशील नाटकर आदी उपस्थित होते. कोरोना नियमाच्या अधीन राहून ‘जनवात्सल्य’ येथील कार्यालयात निमंत्रितांमध्ये हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी पुढे बोलताना श्री. शिंदे म्हणाले की, संतसाहित्य हे दीपस्तंभासारखे असून ते समाजाला दिशा देण्याचे काम करत आले आहे. संतांच्या अभंगाचे सोप्या भाषेत विश्लेषण करण्याचा प्रयोग मनीषा कोठे यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे. संतांचे विचार हे काळाच्या पुढचे होते. त्यांनी वर्तमानाचा ठाव घेत भविष्यातही उपयोगी पडतील असे विचार मांडले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ कवी देवेंद्र औटी यांनी प्रास्ताविकात सुशीलकुमार शिंदे यांच्या कार्याचा गौरव कवितेच्या माध्यमातून केला. श्री. शिंदे यांचे स्थान सोलापूरकरांच्या हृदयात असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी कवयित्री मनीषा कोठे यांनीही कविता सादर केली. शेवटी जागृती पब्लिकेशनचे विजय गायकवाड यांनी आभार मानले.