सोलापूर : संत श्री गजानन महाराज आणि सद्गुरु श्री प्रभाकर स्वामी महाराज यांच्या संत भेटीचा सोहळा उद्या बुधवार दिनांक १० जुलै रोजी सोलापुरात रंगणार आहे. त्यानिमित्त सम्राट चौक येथील सद्गुरु श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सद्गुरु श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्टचे चीफ ट्रस्टी दत्तात्रय देशमुख यांनी दिली.
आषाढी एकादशीनिमित्त शेगाव येथील संत श्री गजानन महाराजांची पालखी शेगावहून पंढरपूरकडे जात आहे. ही पालखी सोलापूर शहरात प्रवेश केल्यानंतर सद्गुरु श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात संत भेटीसाठी येण्याची परंपरा आहे. त्यानुसार बुधवार, १० जुलै रोजी संत श्री गजानन महाराजांची पालखी सकाळी ११ वाजता मंदिरात येईल. यावेळी दोन्ही पालख्यांचा संत भेटीचा सोहळा झाल्यानंतर भाविकांच्या उपस्थितीत आरती करण्यात येणार आहे. यानंतर सुमारे पाच हजार भाविकांना भाकरी, पिठलं, भात, आमटीचा महाप्रसाद देण्यात येणार आहे.
दरम्यान, सद्गुरु श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात महिला भाविकांकडून हजारो भाकऱ्या तयार करण्याचे काम मंगळवारी युद्धपातळीवर सुरू होते. त्याचप्रमाणे मंदिरात स्वच्छता, धार्मिक कार्यक्रमांची तयारी तसेच महाप्रसादाची तयारी करण्यात येत होती.