सोलापूर : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा जुळे सोलापूर यांच्यावतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त एक दिवसाचा साहित्य महोत्सव आयोजित केला आहे अशी माहिती, मसाप जुळे सोलापूरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांनी दिली.
मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी व संवर्धनासाठी १४ ते २८ जानेवारी या कालावधीत राज्यशासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून साहित्य महोत्सवाचे आयोजन केले आहे.
२७ जानेवारी (बुधवारी ) सकाळी ११ वाजता जुळे सोलापुरातील इंडियन मॉडेल स्कूलच्या प्रा.ए.डी. जोशी सभागृहात या साहित्य महोत्सवाचे उद्घाटन सोलापूर आकाशवाणीचे सहायक संचालक सुनील शिनखेडे यांच्या हस्ते आणि हिराचंद नेमचंद वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह डॉ.श्रीकांत येळेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. यावेळी ‘मराठी भाषेचे महत्व’ या विषयावर डॉ.येळेगावकर यांचे व्याख्यान आणि त्यानंतर कथाकार रामकृष्ण आघोर यांचे कथाकथन होणार आहे.
सायंकाळी ६ वाजता कवी माधव पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कविसंमेलनात गोविंद काळे, मारुती कटकधोंड, गिरीश दुनाखे, मंजिरी सरदेशमुख,श्रुतिश्री वडगबाळकर, वंदना कुलकर्णी यांचा सहभाग असेल. महोत्सवाचा समारोप प्रा. ए. डी. जोशी यांच्या भाषणाने होईल, अशी माहिती कार्याध्यक्षा सायली जोशी यांनी दिली.