नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर उद्या म्हणजेच १ ऑगस्टला लष्कराच्या वैद्यकीय सेवा विभागाच्या ‘महासंचालक’ म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. या प्रतिष्ठेच्या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी असणार आहेत. यापूर्वी, एअर मार्शल पदावर पदोन्नती झाल्यानंतर हॉस्पिटल सर्व्हिसेसच्या (सशस्त्र दल) महासंचालक पदावर काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या.
गेल्या वर्षी हॉस्पिटल सर्व्हिसेसच्या (सशस्त्र दल) महासंचालक म्हणून साधना सक्सेना नायर यांनी पदभार स्वीकारला होता. त्यावेळी भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की, “हवाई दलाच्या अधिकारी असलेल्या एअर मार्शल साधना सक्सेना नायर प्रभावीपणे सेवा करणाऱ्या दुसऱ्या महिला अधिकारी आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत हवाई दलातील विविध पदांवर काम केल्यानंतर त्या एअर मार्शल पदापर्यंत पोहोचल्या. पदभार स्वीकारताना हवाई दल प्रमुख व्ही.आर. चौधरी देखील उपस्थित होते.”