येस न्युज मराठी नेटवर्क : जगातील इतर प्रमुख चलनांच्या तुलनेत रुपयातील अस्थिरता कमी असून, त्यात नियमित पद्धतीने चढउतार होताना दिसत आहेत, असे मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केले. रुपयाने मंगळवारी (२१ नोव्हेंबर) डॉलरच्या तुलनेत ८३.३५ ही आतापर्यंतची नीचांकी पातळी गाठली.
या पार्श्वभूमीवर दास म्हणाले की, परकीय चलन विनिमय दराचा विचार करता भारतीय रुपया कमी अस्थिर आहे. इतर प्रमुख परकीय चलनांच्या तुलनेत भक्कम डॉलरच्या बदल्यात रुपयातील चढउतार नित्य स्वरूपातच होताना दिसत आहेत. त्यांच्या मते, भारतीय अर्थव्यवस्थेची सूक्ष्म आर्थिक ताकद आणि मध्यवर्ती बँकेकडील पुरेशी परकीय गंगाजळी यामुळे रुपया फारसा अस्थिर होताना दिसलेला नाही.
किरकोळ महागाईचा दर ऑक्टोबर महिन्यात ४.९ टक्क्यांवर घसरला आहे. हा दर ४ टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचे रिझर्व्ह बँकेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. बँकेचे महागाईला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांवर बारकाईने लक्ष आहे. याचवेळी विकासालाही हातभार लावण्याचे पाऊल उचलले जात आहेत. महागाईचा दर कमी होत असल्याने रिझर्व्ह बँकेचे पतधोरण योग्य दिशेने काम करीत असल्याचे स्पष्ट होत आहे, असे दास यांनी नमूद केले.