उज्वल भारत उभारणीत महिलांचे अपूर्व योगदान – सीईओ स्वामी
सोलापूर – उद्योग, व्यवसाय,आणि सेवाकार्यात महिलांनी मोठा वाटा उचलून आधुनिक ,उज्वल भारत उभारणीत अपूर्व योगदान दिल्याचे प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थने आयोजित केलेल्या व्यवसाय सेवा पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. एकूण सहा पुरस्कारांपैकी पाच पुरस्कार महिलांनी मिळवले आहेत. यातून महिला सक्षमीकरणाचा गौरव होत असल्याचे ते म्हणाले. महिलांच्या या कार्यातून परिवार, समाजावर व्यवसाय आणि सेवेचे उत्तम संस्कारही होत असल्याचे त्यांनी या प्रसंगी सांगितले.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हे पुरस्कार दिलीप स्वामी यांच्या शुभहस्ते वितरित करण्यात आले. यातील पुरस्कार विजेते : १ सविता जुजगर – शेतबीयांपासूनचे पौष्टिक पदार्थ बनवणे, २ सुहासिनी सुरवसे- ब्युटी सुविधा आणि सौंदर्य प्रसाधनांचे प्रशिक्षण, ३ शकील इनामदार – सिलेक्शन बॅग वर्क्स, ४ आसावरी सराफ – नर्सिंग ब्युरो – पेशंटना केअर टेकरची सुविधा देणे, ५ अनिता कोडमुर- योगा प्रशिक्षक आणि थेरपी समुपदेशन, ६ सीमा किणीकर — निरामय आरोग्य धाम सोलापूर, एड्स जनजागृती. इत्यादी समाज उपयोगी सेवा देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.
प्रारंभी रोटरी नॉर्थचे अध्यक्ष डॉ.निहार बुरटे यांनी दिलीप स्वामी यांचा पुष्पगुच्छ, शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला तर त्यांचा परिचय सुनील दावडा यांनी करून दिला. सर्व उपस्थितांचे आभार क्लब च्या सचिवा धनश्री केळकर यांनी मानले. या समारंभास रोटे, राजगोपालजी झंवर, हिरालाल डागा, बळीराम पावडे, सुनील दावडा, डॉ.बाळासाहेब शितोळे, युगंधर जींदे, प्रकाश सोमाणी, जान्हवी माखिजा, मधुरा वडापूरकर, वंदना कोपकर, ललिता शितोळे आदी मान्यवर उपस्थित होते.