मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाल्याचं दिसत आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक बिनविरोध करण्याबाबत लिहिलेल्या पत्रानंतर भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. मुंबईत भाजपच्या बैठकांचा सिलसिला सुरु झाला आहे. त्यानंतर भाजप उमेदवार मुरजी पटेल अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत माघार घेण्याची मुदत आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘मेघदूत’ बंगल्यावर रविवारी रात्री उशिरा बैठक झाली. या बैठकील मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार मुरजी पटेल उपस्थित होते. तर आज सकाळी भाजपचे महाराष्ट्र प्रभारी सी टी रवी, आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा यांच्यात बैठक झाली, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करत आहेत. त्यानंतर भाजप आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचं बोललं जात आहे.