मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांनी विजय मिळवला आहे. पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेऱ्यांपर्यंत लटके या आघडीवर होत्या. ऋतुजा लटके 53471 मतांनी विजयी झाल्या आहेत. दरम्यान हा माझा विजय नसून माझे पती रमेश लटके यांचा विजय आहे त्यांनी केलेल्या कामाची परतफेड जनतेने केलीये अशी प्रतिक्रिया विजयानंतर ऋतुजा लटकेंनी दिली आहे.
आजवर कोणत्याही पोटनिवडणुकीची झाली नव्हती तेवढी चर्चा अंधेरी पूर्व विधानसभेची झाली. सुरुवातीपासून नाट्यमय घडामोडींनी रंगलेल्या या पोटनिवडणुकीची सकाळी मतमोजणी सुरु झाली सर्व फेऱ्यांमध्ये ऋतुजा लटके मोठ्या फरकानं आघाडीवर होत्या. 66 हजार 247 मतं मिळाली आहेत. त्यांच्यानंतर मिळालेली सर्वाधिक मतं कुणा उमेदवाराला नव्हे, तर नोटाला मिळाली आहेत. सर्व फेरीनंतर नोटाला मिळालेल्या मतांचा आकडा साडे बारा हजारच्या घरात पोहोचला आहे. नोटाला 12776 मतं तर अपक्ष उमेदवार बाळा नडार यांना 1506 मतं मिळाली आहेत. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत अंधेरी पूर्व मतदारसंघात जवळपास 1 लाख 47 हजार 117 मतदान झाले होते. त्यापैकी रमेश लटके यांना 62 हजार 773 मतं मिळाली. तर मुरजी पटेल यांना 45 हजार 808 मतं होती.