येस न्यूज नेटवर्क : अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके विजयाच्या उंबरठ्यावर असून मतमोजणी अद्याप सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके या अपेक्षेप्रमाणे आघाडीवर असून दुसऱ्या क्रमांकावर ‘नोटा’ पर्यायाला मोठ्या प्रमाणावर मतदान झाले असल्याचे दिसून आले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर नोटाला मतदान झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना ठाकरे गटाने मतदानापूर्वी नोटाला मतदान करण्याचे आव्हान विरोधकांकडून केले जात असल्याचा आरोप केला होता.
अंधेरी पूर्वचे आमदार दिवंगत रमेश लटके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. शिवसेनेत फूट पडल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक होती. त्यामुळे ठाकरे गटाकडून या निवडणुकीसाठी जोर लावण्यात आला होता. तर, दुसरीकडे भाजपने या पोटनिवडणुकीसाठी मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, अचानकपणे त्यांची उमेदवारी मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर पटेल समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपविरोधातही घोषणाबाजी केली होती.