कौशल्य विकास अभ्यासक्रम प्रमाणपत्र वितरण, संभाषण वर्गाची सांगता
सोलापूर, दि. २६ सप्टेंबर :- येथील द.भै.फ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाचा संस्कृत विभाग आणि देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था सोलापूर या दोन संस्थांमध्ये असलेल्या सामंजस्य कराराचे नूतनीकरण सोमवार दि. २५ सप्टेंबर २३ रोजी दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी महात्मा आनंद कौशल्य विकास केंद्रातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप आणि संस्कृत संभाषण वर्गाचा समारोप कार्यक्रम ही पार पडला.
यावेळी दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार उबाळे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी कराराच्या प्रती एकमेकांकडे सुपूर्त केल्या. तसेच डॉ. येळेगावकर आणि प्राचार्य उबाळे यांच्या हस्ते दयानंद महाविद्यालयात सुरू असलेल्या सर्टिफिकेट कोर्स इन संस्कृत, सर्टिफिकेट कोर्स इन आयुर्वेद परिचारक, सर्टिफिकेट कोर्स इन स्पोकन फ्रेंच, सर्टिफिकेट कोर्स इन अती लोकसौंदर्यम आणि सर्टिफिकेट कोर्स इन योगा या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ. येळेगावकर यांनी संस्कृत भाषेचे महत्त्व सांगून त्याच्या संधीची माहिती यावेळी विद्यार्थ्यांना दिली. प्राचार्य डॉक्टर उबाळे यांनी आपण शिकलेल्या भाषेचा वापर करून त्यात प्राविण्य मिळवावे असे आवाहन केले. डॉ. डी.आर. गायकवाड यांनी या विविध उपक्रमास शुभेच्छा पर मनोगत व्यक्त करून संस्कृतचे पीजी कोर्स, संशोधन केंद्र सुरू व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमात सर्टिफिकेट कोर्स इन संस्कृत या विषयात प्रथम आलेल्या वैशाली गाडगीळ यांना देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेतर्फे एक हजार रुपयाचे पारितोषिक देण्यात आले. तसेच या विभागातील गुणवंत विद्यार्थी ऋषिकेश कुलकर्णी या विद्यार्थ्यास स्वातंत्र्य सेनानी देशभक्त कृ.भी. अंत्रोळीकर न्यासातर्फे एक हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.
यावेळी संस्कृत भारती या संस्थेस संस्कृत संभाषण वर्ग घेण्यासाठी प्रोत्साहनार्थ देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था आणि दयानंद महाविद्यालय या दोन्ही संस्थांनी प्रत्येकी एक हजार रुपये याप्रमाणे देणगी संस्कृत भारतीचे समन्वयक आणि संस्कृत प्रशिक्षक निखिल बडवे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी दे.ऋ.ब्रा.चे उपाध्यक्ष दत्तात्रय आराध्ये, विजय कुलकर्णी, कार्यवाह श्याम जोशी, खजिनदार सतीश पाटील, डॉ. बी. एम. दामजी उपस्थित होते. संस्कृत विभागाच्या प्रमुख डॉ. रेवा कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. खुशाल हबीब या विद्यार्थ्याने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास महाविद्यालयीन विद्यार्थी – विद्यार्थिनी, पारितोषिक प्राप्त विद्यार्थी उपस्थित होते.