सोलापूर : साखर पेठेत राहणाऱ्या रिक्षाचालक गालीब इसमोद्दीन शेख याच्या रिक्षातील तारेची चार बंडल आणि इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा एक लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाठलाग करून शिताफीने पकडला आहे. रेल्वे लाईन जवळील श्रद्धा एम्पायर येथील संदीप स्टील मार्ट मधून हा माल चोरण्यात आला होता. पोलिसांनी चोवीस तासात शिताफीने ही चोरी उघडकीस आणली आहे . गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना चोरीतील आरोपी पंचकट्टा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा लावण्यात आला होता. विजापूर वेस कडून येणाऱ्या एका रिक्षास हटकण्यात आल्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पाठलाग करून हा सर्व माल जप्त करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे , हवालदार अजय पाडवी, पोलीस नाईक कृष्णात कोळी, राजकुमार पवार ,सोमनाथ सुरवसे या पथकाने ही कामगिरी केली आहे.