नवी दिल्ली : कोरोना लसीकरणामुळे झालेल्या कथित मृत्यूची जबाबदारी घेण्यास केंद्र सरकारने नकार दिला आहे. आम्हाला मृत व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल संपूर्ण सहानुभूती आहे, परंतु लसीकरणानंतर कोणत्याही प्रतिकूल परिणामांसाठी आम्हाला जबाबदार धरता येणार नाही असं केंद्राने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
गेल्या वर्षी कोरोना लसीकरणानंतर दोन मुलींचा मृत्यू झाला होता. त्या मृत्यूशी संबंधित प्रकरण सुप्रीम कोर्टात सुनावणीसाठी आहे. या मुलींच्या पालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. याचिकेत सुप्रीम कोर्टाला कोरोना लसीकरणामुळे झालेल्या या कथित मृत्यूंची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्याचसोबत लसीकरणानंतर होणारे दुष्परिणाम वेळेत शोधून त्यावर उपाययोजना करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे आदेश देण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली होती.