नाशिकच्या पालकमंत्री पदाचा अद्याप तिढा सुटलेला नसताना मंत्री गिरीश महाजन यांनी मोठा दावा केला आहे. गिरीश महाजन म्हणाले, नाशिकचा पालकमंत्री कोणीही होवो, कुंभमेळ्याची जबाबदारी माझ्यावरच असणार, असा दावा त्यांनी केला आहे. नाशिक येथे पुढील वर्षापासून सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार असून त्या पार्श्वभूमीवर महाजन यांनी हे विधान केले आहे.
मंत्री गिरीश महाजन यांची कुंभमेळा मंत्री म्हणून नियुक्ती देखील करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली कुंभमेळ्याची तयारी देखील सुरू आहे. परंतु, अद्याप नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नसून शिवसेना शिंदे गटाचे दादा भुसे पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत. तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील माणिकराव कोकाटे आणि छगन भुजबळ देखील पालकमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत.
गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना नाशिक पालकमंत्रीपदाचा निर्णय लवकरच होईल. मात्र, तो निर्णय काहीही असला तरी कुंभमेळ्याची जबाबदारी माझ्यावरच आहे, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
24 हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा
नाशिक महापालिकेने सुमारे 15 हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा सादर केला आहे. याशिवाय, इतर नऊ विभागांनी मिळून सुमारे 9 हजार कोटी रुपयांचे स्वतंत्र आराखडे सादर केले आहेत. यामुळे एकूण 24 हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार झाला आहे. मात्र, या आराखड्याला अद्याप राज्य सरकारची मंजुरी मिळालेली नाही, तसेच राज्याच्या अर्थसंकल्पातही यासाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये येत्या कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतला होता. या वेळी त्यांनी सुमारे 2 हजार कोटी रुपयांच्या विकासकामांसाठी निविदा काढण्यात आल्याचे जाहीर केले. महापालिकेने गोदावरी, वालदेवी आणि नंदिनी या नद्यांवरील पाच नव्या पुलांसह इतर काही पुलांच्या कामांसाठी निविदा काढल्या आहेत. तसेच, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये प्राधिकरण स्थापन करण्याच्या कायद्याला मंजुरी देण्यात आली होती. या नव्या प्राधिकरणाची जबाबदारी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.