सोलापूर विद्यापीठात भाषा, साहित्यावर राज्यस्तरीय कार्यशाळा
सोलापूर, दि. 14– भाषा, साहित्य व संस्कृतीच्या समृद्धतेसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून अभ्यासक व संशोधकांनी अधिक संशोधन करावे, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी केले.

गुरुवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भाषा व वांग्मय संकुलाच्यावतीने पीएम उषा विभागाच्या सहकार्याने ‘भाषा साहित्य आणि डिजिटल टेक्नॉलॉजी’ या विषयावर आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्र- कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवाजी विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता डॉ. अनिल गवळी, भाषा व वांग्मय संकुलाचे संचालक प्रा. डॉ. गौतम कांबळे, कार्यशाळेचे समन्वयक डॉ. शिवानंद तडवळ, डॉ. तानाबाई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. दामा म्हणाले की, आज देशभरात विविध भाषा बोलल्या जातात. प्रत्येक भागातली बोलीभाषा व मातृभाषा ही वेगळी असते. भाषा, साहित्य आणि संस्कृती या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. डिजिटल युग आणि तंत्रज्ञानामुळे यामध्ये बदल होताना आपण पाहत आहोत. तंत्रज्ञानाचा वापर करून तसेच संशोधन करून भाषेच्या विविधतेसाठी तसेच समृद्धतेसाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी यावेळ केले.

यावेळी डॉ. गवळी म्हणाले, भाषा, साहित्य, समाज आणि संस्कृती या सर्व गोष्टी एकमेकांत गुंतले आहेत. आता डिजिटल तंत्रज्ञानामुळे या विषयाची व्याप्ती वाढली आहे. तंत्रज्ञानामुळे भाषा व साहित्यामध्ये बदल होण्याबरोबरच परिणाम देखील होत आहे. त्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे विशिष्ट भाषा व साहित्य निर्माण होत आहे, मात्र त्यात नाविन्यता असणार नाही. आज जगभरात रोबोटचा वापर वाढला आहे, त्यालाही भाषेचाच आधार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. गौतम कांबळे यांनी भाषा व वांग्मय संकुलाचा या शैक्षणिक वर्षातील हा दुसरा कार्यक्रम असल्याचे सांगून विद्यार्थी व संशोधकांसाठी संकुल सतत प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. रघुनाथ कडाकणे यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नानासाहेब गव्हाणे यांनी केले तर आभार डॉ. तानाबाई पाटील यांनी मानले.
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भाषा व वांग्मय संकुलाच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्र- कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, डॉ. अनिल गवळी, प्रा. डॉ. गौतम कांबळे, डॉ. शिवानंद तडवळ, डॉ. तानाबाई पाटील.