सोलापूर – इंदिरा गांधी स्टेडियम (पार्क स्टेडियम), सोलापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या नॅशनल टी-२० ट्रॉफी २०२५ या प्रतिष्ठेच्या क्रिकेट स्पर्धेत सोलापूर पोलीस क्रिकेट संघाने उपविजेतेपद पटकावत सोलापूर पोलीस दलाचे नाव उज्वल केले आहे. या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील आठ आघाडीच्या संघांना आमंत्रित करण्यात आले होते. दिनांक ०१ जुलै २०२५ रोजी झालेल्या अंतिम सामन्यात सोलापूर पोलीस क्रिकेट क्लब विरुद्ध साऊथ सोलापूर क्रिकेट क्लब यांच्यात रंगतदार सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना सोलापूर पोलीस संघाने ५ बाद १९१ धावा केल्या. मात्र साऊथ सोलापूर संघाने ७ विकेट्सने विजय मिळवत ट्रॉफी आपल्या नावावर केली. सोलापूर पोलीस संघाने मात्र अप्रतिम खेळ करत स्पर्धेत आपले वेगळे स्थान निर्माण केले.
या संघाच्या घडणीत आणि यशामागे माननीय पोलीस आयुक्त एम. राजकुमार व सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) राजन माने यांचे महत्त्वाचे योगदान असून त्यांच्या प्रोत्साहनातून सोलापूर पोलीस क्रिकेट क्लबची निर्मिती झाली. या संघाचे नेतृत्व सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील-सोनवणे करत असून त्यांनी संघबांधणीसाठी विशेष प्रयत्न केले.
संघातील खेळाडूंची खासियत अशी की:
दैनंदिन खडतर पोलीस काम, गुन्हेगारी तपास, रात्रपाळी, जिल्ह्याबाहेरील बंदोबस्त अशा जबाबदाऱ्या पार पाडून हे पोलीस अधिकारी आपली क्रिकेटची आवड जपत मैदानात दमदार कामगिरी करत आहेत. त्यांच्या खेळाप्रती असलेल्या निष्ठेचा आणि समर्पणाचा गौरव करावा तितका थोडाच आहे.
मा. पोलीस आयुक्त एम राजकुमार, सोलापूर शहर व राजन माने मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर पोलीस क्रिकेट संघासाठी खालील पोलीस अधिकारी व अंमलदार कामगिरी बजावत आहे.
निलेश पाटील-सोनवणे एपीआय, दत्ता काळे एपीआय, संतोष येडे पीएसआय, HC३६५/श्रीकांत लिंबोरे, PC१७३४/हनुमंत पुजारी,HC१४१५महेश हरकल,HC १३१४/वसंत माने,HC/३११/धनाजी बाबर, HC १२११/विजय पवार, HC/१२२५/अनिल जाधव, PC/१४४३/राजपाल सरवदे, PC ५६७/इस्माईल पीरजादे.
सोलापूर पोलीस दलाला अभिमान आहे अशा या क्रिकेट संघाचा, जो पोलिसी शिस्त, मेहनत आणि चिकाटी यांच्या जोरावर खेळातही पुढे जात आहे. भविष्यात सोलापूर पोलीस क्रिकेट क्लब आणखी भरारी घेईल, अशी आशा सोलापूरकरांना आहे.